ayurved-institute

मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी निर्देशित केल्यानुसार दि. 23 सप्टेंबर 2025 हा १० वा आयुर्वेद दिन पोदार महाविद्यालय व रुग्णालय, वरळी, मुंबई येथे मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण व आयुष विभागाचे मा. आयुक्त श्री अनिल भंडारी तसेच मा. आयुष संचालक वैद्य रमण घुंगराळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मा. आयुक्त श्री अनिल भंडारी यांनी संपूर्ण पोदार रुग्णालय, नवीनच बनलेली अत्याधुनिक स्किल लॅब, शरीररचना विभागातील विच्छेदनाचे आधुनिक तंत्र तसेच संपूर्ण परिसरात भेट दिली.

त्यानंतर आयुर्वेद दिनानिमित्त आयोजित अतिशय सुंदर अशा आयुर्वेद प्रदर्शनीस भेट दिली. मा. आयुक्तांनी सर्व आयोजित कार्यक्रमाची प्रशंसा केली. तसेच हे तंत्रज्ञान सर्व समाजाला सुद्धा अवगत व्हावे अशी सूचना केली. पोदार महाविद्यालय व रुग्णालय तर्फे मा. आयुक्त व मा. संचालक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी आयुर्वेद दिनाच्या निमित्याने विविध विभागांनी विविध आयुर्वेद विषयांवर सांस्कृतिक कलाकृती सादर केल्या ज्यातून आयुर्वेदाच्या संदेश जनजागृती होईल. त्यानंतर मान्यवरांची आयुर्वेद दिनावर भाषणे झाली. महाविद्यालय व रुग्णालय अधिष्ठाता मा. वैद्या संपदा संत यांनी या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करून प्रास्ताविक केले.

कार्यक्रमाचे वेळी निवासी वैद्यकीय अधिकारी वैद्य सुहास कोळेकर, प्रशासकीय अधिकारी श्री नरसू पाटील व श्री अनिल बंदिष्टी, सर्व विभाग प्रमुख, अधिसेविका सौ मार्गारेट घोरपडे, सर्व अध्यापक, रुग्णालयीन कर्मचारी, व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात वैद्य मनोज गायकवाड, वैद्या सीमा बहातकर, वैद्या प्रज्ञा कापसे, वैद्य प्रशांत दळवी, श्री मद्रासी, वैद्य निकेतन झोडपे, वैद्य सुमंत खर्डेनविस यांनी विशेष सहभाग नोंदवला. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व संचलन स्वस्थवृत विभागाचे वैद्या वृषाली उजेडे, वैद्या मीनल पजई, वैद्या सायली साठे यांनी केले.